मुंबई- इतिहासात प्रथमच भारतात एवढी आर्थिक मंदी आली आहे. जुलै ते सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेत साडेसात टक्क्यांनी घटली आहे. मागील तिमाहीत ही घसरण 24.9 टक्के होती. आजची परिस्थिती त्यापेक्षाही चांगली आहे का? चिंताजनक? याविषयी ईटीव्ही भारतने तज्ज्ञांची मते जाणून घेतली आहे.
चालू आर्थिक वर्षात जीडीपीत मोठी घसरण होत आहे. असे असले तरी केंद्रीय अर्थमंत्रालयाने अर्थव्यवस्था सावरत असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने आयकॅस्टिंग ही आर्थिक अंदाज वर्तविणारी नवीन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीच्या अंदाजानुसार तिमाहीत जीडीपीमध्ये 8.6 टक्के घट होण्याची शक्यता आरबीआयने वर्तविली होती.
देशाच्या आर्थिक स्थितीबाबत तज्ज्ञांची मते वेगवेगळी आहेत. मागील तिमाहीच्या तुलनेत अर्थव्यवस्थेने चांगली सुधारणा केली आहे. हा ट्रेंड तिसऱ्या तिमाहीतही असाच दिसून येईल, असे अर्थतज्ज्ञ सांगतात. टाळेबंदी खुली केल्याने दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सावरत आहे. टाळेबंदीत रुतलेले अर्थव्यवस्थेचे चाक पुन्हा सुरू होईल, असे अर्थतज्ज्ञ सांगतात. दुसरीकडे अर्थतज्ज्ञांच्या मते ही सुधारणा नसून अर्थव्यवस्था अजून उणे 7.5 टक्क्यांनी घटली आहे. त्यासाठी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणालाही अर्थतज्ज्ञ जबाबदार मानत आहेत.
संबंधित बातमी वाचा-मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत विकासदर १.२ टक्के राहिल - एसबीआय
कृषिक्षेत्रात 3.4 टक्के वाढ-
अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रात घसरण झाली असली तर कृषी क्षेत्राने चंदेरी किनार दाखविली आहे.सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मते, आथिर्क वर्ष 2021 च्या दुसर्या तिमाहीतील सकल मालमत्ता मूल्य (जीव्हीए) उणे टक्के झाला आहे. ते अंदाजे उणे 8.6 टक्के होते. त्याच वेळी कृषी क्षेत्राचा विकास दर 4.4 टक्के राहिला आहे. यापूर्वी कृषी क्षेत्राचा विकासदर 3.9 टक्के राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत सात टक्क्यांची घसरण सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दुसर्या तिमाहीत जीडीपीचा विकासदर-
- कृषी क्षेत्र : 4.4 टक्के
- खाण :9.1 टक्के
- उत्पादन : 0.6 टक्के
- वीज: 4.4 टक्के
- बांधकाम -8.6 टक्के
- व्यापार आणि हॉटेल: -15.6 टक्के
- वित्त, विमा आणि मालमत्ता: -8.1 टक्के
संबंधित बातमी वाचा-अर्थव्यवस्थेची गेल्या ४० वर्षातील सर्वात मोठी घसरगुंडी; पहिल्या तिमाहीत २३.९ टक्क्यांची घसरण
शेअर बाजार तज्त्र पंकज जयस्वाल म्हणाले, की टाळेबंदीनंतर पहिल्या तिमाहीत जीडीपीत मोठी घसरण झाली होती. तर दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत सुधारणा होत आहे. बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी म्हणाले, की देशाच्या 200 लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेत 24 टक्के घसरण म्हणजे 50 लाख कोटी संपत्तीचा चुराडा आहे. तर दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत उणे साडेसात टक्क्यांची घसरण आहे. त्यामुळे सरकार प्रगती असल्याचे कोणते दावे करत आहे, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
पहिल्या तिमाहीत 1979 नंतरची सर्वात मोठी घसरण-
कोरोना महामारीपूर्वी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जानेवारी ते मार्च तिमाहीत विकासदर हा 3.1 टक्के होता. तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये विकासदर हा त्यामागील 11 वर्षात सर्वात कमी 4.2 टक्के राहिला होता. कोरोना महामारीमुळे देशात25 मार्च 2020 ला टाळेबंदी लागू केल्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.
विविध बँका आणि संस्थांच्या मत देशाचा जीडीपी हा चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत किमान 15 ते 20 टक्के घसरण्याचा अंदाज होता. अर्थव्यवस्थेच्या विकासदरात 23.9 टक्के घसरण झाली. ही 1979 नंतरची विकासदरामधील सर्वाधिक मोठी घसरण आहे. तेव्हा देशाचा विकासदर 1979 मध्ये उणे 5.2 टक्के झाला होता.