नवी दिल्ली- पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ई़डी) मुंबईत आज पुन्हा छापे टाकले आहेत. एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग यांच्या मालकीच्या जागावर हे छापे टाकण्यात आले आहेत. राज्यातील वरिष्ठ नेत्यांना वाधवान याने घरे भेट दिल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ईडीला छाप्यादरम्यान वाधवानच्या नावाने आणखी एक जेट आणि यांत्रिकी बोट नोंद असल्याचे आढळून आले. अलिबागमध्ये वाधवान याचा २२ खोल्या असलेला मोठा बंगला आढळून आला. या बंगल्यावर लवकरच जप्ती करण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच प्रवर्तकाच्या नावे आणखी एक खासगी जेट विमान असल्याचे ई़डीला आढळून आले. वाधवान यांनी राज्यातील काही वरिष्ठ राजकीय नेत्यांना घरे भेट म्हणून दिल्याचे झडतीमध्ये आढळून आले. मात्र, या राजकीय नेत्यांची नावे ईडीकडून सांगण्यात आली नाहीत.