नवी दिल्ली -देशाची अर्थव्यवस्था ही नोटाबंदी, सदोष वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि अयशस्वी ठरलेली टाळेबंदी या कारणांनी उद्धवस्त झाल्याचे सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेसाठी देवाचे कृत्य असलेल्या कोरोना महमारी जबाबदार ठरल्यावरून गांधींनी ही टीका केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महामारीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे गुरुवारी म्हटले. हे कृत्य देवाचे असल्याचे (अॅक्ट ऑफ गॉड) असल्याचेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले होते. चालू आर्थिक वर्षात विकासदरात घसरण होणार असल्याचे सीतारामन यांनी मत व्यक्त केले. चालू वर्षात आपण असामान्य स्थितीला सामोरे जात आहोत. आपण देवाच्या कृतीला तोंड देत आहोत. कदाचित आपल्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली असेल, असे सीतारामन यांनी म्हटले होते. यावर राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले, भारतीय अर्थव्यवस्था तीन कृतीमुळे उद्धवस्त झाली आहे. १. नोटाबंदी. २ सदोष जीएसटी ३. अपयशी ठरलेली टाळेबंदी. गांधींनी ट्विटसोबत सीतारामन यांच्या विधानाच्या वृत्ताला टॅग केले आहे. त्यावर गांधींनी सर्व काही खोटे असल्याचे म्हटले आहे.