नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज सकाळी ११ वाजता आर्थिक पॅकेजचा शेवटचा पाचवा टप्पा जाहीर करणार आहेत. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदी या कारणांनी विविध क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी यापूर्वी आर्थिक पॅकेजचे चार टप्पे जाहीर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर सलग चार दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. सीतारामन या पाचव्या टप्प्यातील अर्थसंकल्पात आज कोणत्या क्षेत्राला दिलासा देणारे पॅकेज जाहीर करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
संबंधित बातमी वाचा-आठ क्षेत्रातील सुधारणांची घोषणा; संरक्षण क्षेत्रातील एफडीआयला ४४ टक्क्यांवरून ७४ टक्के परवानगी
- चौथ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज
निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजच्या चौथ्या टप्प्यात शनिवारी आठ क्षेत्रांसाठी सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोळसा, खनिज उत्खनन, संरक्षण उत्पादन, हवाई वाहतूक क्षेत्र व्यवस्थापन, उर्जा वितरण कंपन्यांचे खासगीकरण, अंतराळ आणि आण्विक उर्जा या क्षेत्रांचा समावेश आहे.
- तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज-
निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी तिसऱ्या टप्प्यातील कृषी केंद्रीत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
काही महत्त्वाच्या योजना जाहीर
- मधुमक्षिका पालनासाठी ५०० कोटींची योजना
- दुग्ध उत्पादन क्षेत्रासाठी १५ हजार कोटींची मदत
- औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत
- पीएम मत्स्य संपदा योजनेतून मत्स्य उद्योगासाठी २० हजार कोटींची मदत
संबंधित बातमी वाचा-आता देशात कोठेही मिळणार रेशनकार्डवर धान्य; स्थलांतरीत मजुरांना २ महिन्यांचे धान्य मोफत
- दुसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज-
स्थलांतरीत मजूरांना दोन महिन्यांचे धान्य देण्यात येणार
८ कोटी मजूरांसाठी २ महिन्यांच धान्य देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने ३५ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. प्रत्येक व्यक्तीला ५ किलो धान्य देण्यात येणार आहे. यामध्ये १ किलो डाळीचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे माघारी परतणाऱ्या नागरिकांसाठी मनरेगा योजेनेद्वारे मदत करण्यात येणार आहे.