जळगाव - चीनमध्ये कोरोना विषाणुची लागण वाढल्याने चीन सरकारने ८० टक्के आयात-निर्यात थांबविली आहे. त्यामुळे भारताकडून येणाऱ्या कापसाचीही आयातही चीनने थांबवली आहे. देशात कापसाच्या ३ लाख गाठी देशात पडून आहेत. निर्यात थांबल्यामुळे भारतीय कापूस निगमने (सीसीआय) जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत.
सरकारी कापूस खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनाही नाईलाजास्तव हमीभावापेक्षा तब्बल ५०० रुपये कमी दराने कापूस विकावा लागत आहे.
चीन हा भारताचा आयात करणारा प्रमुख देश आहे. दरवर्षी भारताकडून १२ ते १५ लाख गाठी चीनला निर्यात होतात. यंदा जानेवारीपर्यंत ६ लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली आहे. मात्र, कोरोना विषाणुचे प्रमाण वाढत असल्याने चीनमधून आयात-निर्यात थांबविली आहे. त्यामुळे कापसाची निर्यात पुर्णपणे थांबली आहे. भारतासह अमेरिका व इतर देशातील निर्यात थांबविल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील त्याचा परिणाम होत आहे. आधीच अमेरिका व चीनच्या व्यापार युद्धामुळे चीनमधील निर्यातीवर परिणाम झाला होता.
अचानक कापूस केंद्र बंद करण्याचा फतवा-
सीसीआयचे केंद्र दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरू राहत असतात. मात्र, ३० जानेवारीला सीसीआयने तातडीने पत्र काढून ५ फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी थांबविण्याचे काढले. तसेच पुढील आदेश येईपर्यंत खरेदी सुरू करू नये असेही आदेश सीसीआय प्रशासनाने काढले आहेत. कापूस खरेदी थांबविण्याबाबतचे कोणतेही कारण सीसीआयने दिलेले नाही.