नवी दिल्ली- कोरोनाने विविध क्षेत्रावर परिणाम झाला आहे. या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कोविड-१९ आर्थिक प्रतिसाद टास्क फोर्स'ची स्थापना करण्याची गुरुवारी घोषणा केली.
'कोविड-१९ टास्क फोर्स'चे अध्यक्षपद हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे असणार आहे. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना दिली आहे. देशाने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द केल्याने पर्यटन आणि विमान वाहतूक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोना महामारीने आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. सरकारने 'कोविड-१९ आर्थिक प्रतिसाद टास्क फोर्स'ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-कोरोनाने गुंतवणूकदांराचे चार दिवसातच १९.४९ लाख कोटी रुपये पाण्यात
व्यापारीवर्गाने आणि कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताकडे लक्ष देण्याची मोदी यांनी विनंती केली. जर कर्मचारी प्रवास अथवा इतर निर्बंधामुळे कामावर गैरहजर राहिले तर त्यांना दंड ठोठावू नका, असेही मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द झाल्याने अनेक हॉटेलची बुकिंग रद्द झाली आहे. चीनमधील वुहान येथील उद्योग अंशत: ठप्प झाल्याने देशातील औषधी उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर विपरित परिणाम झाला आहे. पर्यटन क्षेत्राच्या संघटनेच्या अंदानुसार सुमारे ३.८ लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. पर्यटन उद्योगाने कर सवलतीसह इतर मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केल्या आहेत.
हेही वाचा-कोरोनाचा अर्थजगतावर परिणाम : जाणून घ्या, काही महत्त्वाच्या घडामोडी