नवी दिल्ली- आरबीआयच्या राखीव निधीतून १.७६ लाख कोटी रुपये घेणार असल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. अर्थव्यवस्था मंदावली असताना सरकारने आठवडाभरात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केली. ते काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
आनंद शर्मा म्हणाले, भारत हा अत्यंत आर्थिक संकटात आहे. अर्थव्यवस्था गोंधळात आहे. सर्व निर्देशांकामधून विकास कमी झाल्याचे दिसत आहे. भारताच्या जीडीपीमध्ये सतत घसरण होत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ गेल्या तिमाहीत जीडीपी हा वाढून ५.८ टक्के झाला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत जीडीपी हा ५.६ टक्के होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे गेल्या सात वर्षातील सर्वात कमी प्रमाण आहे.
पुढे ते म्हणाले, औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा २ टक्के तर उत्पादन निर्देशांक हा १.२ टक्के राहिला आहे. रुपयाचा दर हा ४ टक्क्याने घसरला आहे. आशिया खंडातील चलनामध्ये रुपयाची सर्वात खराब कामगिरी रुपयाने केली आहे. बेरोजगारीचे प्रत्यक्ष प्रमाण हे ८.२ टक्के नसून २० टक्क्यांहून अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.