नवी दिल्ली- आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने तयार केला आहे. मौल्यवान रत्ने आणि दागिन्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, असा प्रस्ताव करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
मागील अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवून 12.5 टक्के केले होते. येत्या अर्थसंकल्पात मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांवरील आयात शुल्क 5 टक्के करावे, अशी उद्योगाची मागणी आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे.
हेही वाचा-...म्हणून फ्लिपकार्टसह अॅमेझॉनची होणार चौकशी
- सोन्याच्या आयातीबरोबर दागिन्यांच्या निर्यातीतही घसरण -
सोन्याची आयात नोव्हेंबरमध्ये 152 टनावरून डिसेंबरमध्ये 39 टन झाली आहे. सोन्याची आयात घटल्याने देशाच्या चालू खात्याची (सीएडी) वित्तीय तूट कमी झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. सोन्याची भारतात सर्वाधिक सुमारे 800 ते 900 टन आयात करण्यात येते. चालू आर्थिक वर्षात मौल्यवान रत्ने आणि दागिन्याच्या निर्यातीत एप्रिल-नोव्हेंबरदरम्यान 1.5 टक्के घट झाली आहे. ही निर्यात 20.5 अब्ज डॉलर एवढी झाली आहे.
हेही वाचा-'पीएमसी'चे पुनरुज्जीवन; शरद पवारांनी घेतली अनुराग ठाकूर यांची भेट