नवी दिल्ली- केंद्र सरकार बंद असलेल्या साखर कारखान्यांच्या जागेचा वापर करून इथेनॉलची निर्मिती करणार आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या धोरणातून जुन्या साखर कारखान्यांचे पुनरुवज्जीन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
इथेनॉल अर्थव्यवस्थेत २५ हजार कोटींहून १ लाख कोटी होण्याची क्षमता आहे. त्यामधून कच्च्या तेलाच्या आयातीसाठी लागणारे ७ लाख कोटी रुपये वाचू शकणार असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले. ते म्हणाले, की देशात खूप साखर कारखाने बंद पडले आहेत. त्यासाठी मी नवे धोरण विकसित करणार आहे. या कारखान्यांची अशी स्थिती आहे, की त्यांना आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यावर मंत्रिमंडळात विचार होण्यासाठी प्रक्रिया व्हावी, अशी माझी इच्छा आहे. बंद असलेल्या साखर कारखान्याची ५ ते ६ एकर जमिनीचा वापर इथेनॉलच्या निर्मितीसाठी केला जावू शकतो.
हेही वाचा-देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी टीव्हीएसकडून लाँच
साखर, उसाचा रस आणि मळीपासून इथेनॉल तयार करण्यासाठी साखर कारखान्याच्या जागेचा वापर केला जावू शकतो. हरित उर्जा तयार करण्यासाठी कमी व्याजावर कर्ज मिळण्यासाठी काही बँकांबरोबर करार झाल्याचे त्यांनी सांगितले. एमएसएमईमधील हरित उर्जेसाठी केएफडब्ल्यूबरोबर करार झाला आहे. साखर कारखान्यांनी निधी द्यावा, यासाठी त्यांना राजी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाबरोबर यंत्रणा विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गडकरींनी सांगितले.
हेही वाचा-मराठवाड्यात सरसकट येणार ऊस पिकावर बंदी?
साखरेपासून इथेनॉल तयार केल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. पेट्रोल-डिझेलला पर्याय देताना त्यावर बंदी येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जीएसटी कमी असलेल्या इंधनाला प्रोत्साहन देण्याची इच्छा आहे. भारत हा उत्पादन, इलेक्ट्रिक वाहन आणि पर्यायी इंधनाचे केंद्र (हब) होणार असल्याची वेळ येणार आहे, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-नवीन मोटार वाहन कायदा : राज्य सरकारने दंड ठरवावा - नितीन गडकरी