महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ठराविक नव्हे तर सर्वच राज्यांचा जीएसटी मोबदला थकित - निर्मला सीतारामन - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

राज्यांना जीएसटी मोबदला देण्यात दिरंगाई होत असल्याची कबुली निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली. मात्र, केंद्र सरकारने चालू वर्षात संकलित झालेल्या उपकराहून अधिक उपकर राज्यांना वितरित केल्याचे त्यांनी सांगितले.

Nirmala Sitaraman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By

Published : Dec 13, 2019, 2:10 PM IST

Updated : Dec 13, 2019, 3:48 PM IST

नवी दिल्ली - केवळ विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांचा जीएसटी (वस्तू व सेवा कर) मोबदला थकित नाही. इतर राज्यांचाही जीएसटी मोबदला ऑगस्टपासून थकित असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले.


राज्यांना जीएसटी मोबदला देण्यात दिरंगाई होत असल्याची कबुली निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली. मात्र, केंद्र सरकारने चालू वर्षात संकलित झालेल्या उपकराहून अधिक उपकर राज्यांना वितरित केल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार राज्यांना जीएसटी मोबदला देण्यासाठी बांधील असल्याचेही त्यांनी म्हटले. केंद्र सरकारने राज्यांकडून ५५ हजार ४६७ कोटी रुपये उपकर संकलित केला. तर ६५ हजार २५० कोटी उपकर वितरित केल्याची सीतारामन यांनी माहिती दिली. केंद्र सरकारने संकलित उपकराहून अधिक ९ हजार ७८३ कोटी रुपये राज्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत दिले आहेत.

संबंधित बातमी वाचा -जीएसटी परतावा लवकर मिळावा, महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे मागणी

अनेक राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी जीएसटी मोबदला थकित असल्यामुळे चिंता व्यक्त केली होती. तर देशातील नऊ राज्यांनी जीएसटी मोबदला थकित असल्याची तक्रार केली आहे. जीएसटी लाँच करताना केंद्र सरकारने राज्य सरकारांना बुडणाऱ्या महसुलापोटी जीएसटी मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाप्रमाणे केंद्र सरकारने राज्य सरकारांना जीएसटी मोबदला द्यावा, अशी नऊ राज्यांनी मागणी केली आहे.

संबंधित बातमी वाचा -जीएसटीचा मोबदला रखडल्याने 'या' राज्यांना चिंता; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घेतली भेट

दरम्यान, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला १५ हजार ५५८ कोटी ५ लाख रुपये कर परताव्यापोटी येणे बाकी आहे. हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकासकामांवर परिणाम होत असल्याचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला लिहिले आहे.

Last Updated : Dec 13, 2019, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details