नवी दिल्ली- मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविंधावर भर दिला आहे. यामध्ये अन्नदाता शेतकरी आता उर्जा दाता बनविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी शेतीसंबधी पांरपरिक उद्योगांना चालना देणार असल्याचे सांगितले यामध्ये मध गोळाकरणे, बांबू लागवड आणि त्याच्या संबधित उद्योगांना चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. खादी उद्योगासह शेतीसंबंधीत क्लस्टर उद्योगाची उभारणी केली जाणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला तंज्ञत्रानाची जोड देऊन त्याचे मार्केटींग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातून स्पष्ट केले आहे.
अन्नदाता आता, ऊर्जा दाता होणार अन्नदाता आता उर्जा दाता करणार असल्याचे सांगताना सीतारामन म्हणाल्या की आम्ही शेतकऱ्यांना खासगी उद्योग सुरू करण्यासाठी सहाय्य करण्यासह अपारंपरिक उर्जा निर्मितीसाठीही प्रोत्साहन देणार आहोत. कृषी बरोबरच दुग्ध व्यवसायासाठीही सरकार विविध योजना कार्यान्वित करणार असल्याचा उल्लेख सीतारमन यांनी या अर्थसंकल्पात केला आहे.
भारतातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाला चांगला भाव मिळावा म्हणून राज्य आणि केंद्र सरकार मिळून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दाळ उत्पादनात भारत देश स्वयंपूर्ण करयाचा असून तेलबियांचेही उत्पादन वाढवण्यासाठी प्रात्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे तेल आयातीचा खर्च ही कमी होण्यास मदत होईल असे ही सीतारामन म्हणाल्या.
आम्हाला शुन्य बजेट शेतीला प्रोत्साहन द्यायचे आहे. काही राज्यामध्ये शून्य बजेट शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, इतर राज्यातही ते केले जाईल. तसेच शून्य बजेट शेतीसाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहोत. येत्या ५ वर्षांत १० हजार नवीन शेतकरी उत्पादक संघटना स्थापणार असल्याचेही सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावेळी स्पष्ट केले.