नवी दिल्ली - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवरून टीका होत असल्याने भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयाची माहिती जनतेला दिली जाणार आहे.
भाजपने सर्व राज्यांना राज्यपातळीवर कार्यशाळा आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर 'जाहीर संवाद' कार्यक्रम घेण्याची सूचना केली आहे. या कार्यशाळा १६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीदरम्यान राज्यांच्या भाजप मुख्यालयात घेण्यात येणार आहेत. यामध्ये मोदी सरकारचे धोरण लोकस्नेही असल्याची जागृती करण्यात येणार आहे.
हेही वाचा-'दर कपातीचा फायदा देण्याच्या प्रमाणात आणखी सुधारणा होईल'
कार्यशाळेला वित्त क्षेत्रातील वक्त्यांना बोलवावे, अशी सूचना भाजपने राज्य पक्ष कार्यालयांना केली आहे. व्यावसायिक संस्थांनाही कार्यशाळेचे निमंत्रण देण्याची सूचनाही केली आहे. या कार्यशाळांसाठी भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव आणि पी. मुरलीधर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा-कोरोनाचा व्यापारावर होणार परिणाम; केंद्रीय अर्थमंत्री उद्योगांच्या प्रतिनिधींची घेणार भेट
भाजपने अर्थसंकल्पावर जिल्हानिहाय बैठका घेण्याचाही निर्णय घेतला आहे. या बैठका २४ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान सुरू राहणार आहेत. बेरोजगारी आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर केंद्रीय अर्थसंकल्पात उपाय केले नसल्याची टीका विरोधी पक्षांनी यापूर्वी केली आहे.