चेन्नई - केंद्रीय अर्थसंकल्पानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विविध शहरात माध्यम प्रतिनिधी, अर्थतज्ज्ञ आणि इतरांशी संवाद साधत आहे. त्यांनी चेन्नईमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव अतनू चक्रवर्ती हे चक्क डुलक्या घेताना दिसून आले.
केंद्र सरकारने 'विवाद से विश्वास' ही योजना केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे. यावर माध्यम प्रतिनिधीने लाभांश वितरण योजनेत किती विवाद प्रलंबित आहेत, असा प्रश्न निर्मला सीतारामन यांना विचारला. त्यावर महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ही योजना सर्वांसाठी खुली आहे. प्राप्तिकरामधील वादांची सुमारे ४ लाख ९० हजार अपिलीय प्रकरणे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेची अनेकांना प्रतिक्षा होती, असेही पांडे यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव अतनू चक्रवर्ती यांना झोप अनावर होत नव्हती. ते डुलक्या घेत होते. तर दुसरीकडे पांडे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती देत होते. या पत्रकार परिषदेला वित्तीय सचिव राजीव कुमार आदी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.