नवी दिल्ली- आंध्र प्रदेशने देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उद्योगानुकूलतेत पुन्हा पहिला क्रमांक मिळविला आहे. हा उद्योगानुकूलतेचा अहवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केला आहे.
उत्तर प्रदेशचा उद्योगानुकूलता २०२०च्या यादीध्ये दुसरा तर तिसरा तेलंगणाचा क्रमांक आहे. ही यादी 'उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार'ने (डीपीआयआयटी) तयार केली आहे. उद्योगानुकूलतेच्या गुणांकनामधून राज्य व केंद्रशासित प्रदेश हे उद्योग सुरू करण्यासाठी आणखी चांगले ठिकाण होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. उद्योगानुकूलतेमध्ये बांधकाम परवाना, कामगार नियमन, पर्यावरणाची नोंदणी, माहितीची उपलब्धता, जमिनीची उपलब्धता आणि एक खिडकी पद्धती आदी निकष विचारात घेण्यात आले आहेत. औद्योगिकरणात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र राज्याचा पहिल्या चारमध्येही समावेश झाला नाही.