नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनीच भाजपच्या आर्थिक धोरणावर एका दैनिकातील लेखातून टीका केली. या टीकेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या पाच वर्षात वस्तू व सेवा कर अशा आर्थिक सुधारणा केल्याचे सांगितले.
सरकारने दिवाळखोरी आणि नादारी तसेच आधारमध्ये सुधारणा करून त्याची अंमलबजावणी केल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. उज्जवला योजनेचा ८ लाख महिलांना फायदा मिळाला आहे. कररचनेत खूप बदल करण्यात आले आहेत. स्टार्टअपला १ ऑक्टोबरनंतर जगात सर्वात कमी भारतात कर द्यावा लागणार आहे. या सर्व निर्णयांचे कौतुकही झाल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात वस्तू व सेवा कर (जीएसटी), दिवाळखोरी व नादारी कायदा (आयबीसी) आणि आधार कार्ड अशा महत्त्वाच्या सुधारणा केल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-पंजाब व महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांच्या चिंतेचे निराकरण करण्यात येईल - अर्थमंत्री
अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी काय केली होती टीका-
मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता भाजप सरकारने पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या आर्थिक प्रारुपाचा अवलंब करावा, असे त्यांनी एका दैनिकाच्या लेखात म्हटले आहे. दोन्ही काँग्रेसचे माजी पंतप्रधान हे आधुनिक देशाच्या अर्थव्यवस्थेमधील आर्थिक सुधारणांचे स्तंभ मानले जातात. भाजपने त्यांचा स्वत:चा कोणताही आर्थिक रचनेचा प्रस्ताव आणला नाही, याकडेही त्यांनी लेखातून लक्ष वेधले. नेहरुंचे आर्थिक प्रारुप (मॉडेल) पक्षाचा थिंक टँक समजू घेण्यात अपयशी ठरल्याची त्यांनी टीका केली.
हेही वाचा-'मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे भारतात दिसणार स्पष्ट परिणाम'
भाजप पक्षाने हे नाही, ते नाही (नेती नेती) असे आर्थिक धोरण अवंलबिले आहे. हे करताना त्यांनी एकत्रितपणे त्यांच्याच धोरणाचा अवलंब केला नाही, असेही त्यांनी लेखात म्हटले आहे.
कोण आहेत प्रभाकर ?
प्रभाकर हे अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांनी आंध्र प्रदेश सरकारसाठी दूरसंचार सल्लागार म्हणूनही काम केले आहे.