मुंबई - केंद्र सरकारकडून राज्याला 16 हजार 654 कोटींची थकबाकी येणे आहे. सध्याची आर्थिक स्तिथी पाहता ही थकबाकी एकाच दिवसात मिळावी अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
राज्यावर ‘कोरोना’चे संकट आहे. ‘टाळाबंदी’मुळे राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने राज्याच्या उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात थकबाकीसह ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्याला 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज तातडीने द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. या मागणीचे पत्र अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारमधील राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिले आहे.
हेही वाचा-धक्कादायक ! दारू मिळत नसल्याने कोल्हापुरात यंत्रमाग कामगाराची आत्महत्या
राज्याची आर्थिक स्थिती व राज्यासमोरील आव्हानांची माहिती अर्थमंत्र्यांनी पत्रात दिली आहे. केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशात तीन आठवड्यांची टाळाबंदी जाहीर केली आहे. या टाळाबंदीमुळे उद्योग, व्यापार व सेवाक्षेत्र ठप्प आहे. त्याचा राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.