नवी दिल्ली- येस बँकेच्या ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. येस बँकेच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक काम करत असल्याची त्यांनी माहिती दिली.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारतीय रिझर्व्ह बँकेशी सतत संपर्कात आहे. मध्यवर्ती बँकेने सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यांनी लवकर उपाय शोधणार असल्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित असल्याचे मी ग्वाही देते.
ठेवीदार, बँक आणि अर्थव्यवस्थेच्या हितासाठी पावले उचलली आहेत. कोणत्याही ठेवीदाराचे नुकसान होणार नसल्याचे आरबीआयचे गव्हर्नर यांनी आश्वासन दिले. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे खातेदारांना ५० हजार रुपयांहून अधिक रक्कम काढता येत नाही. त्यामुळे बँकेला कोणतेही नवीन कर्ज घेता येत नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करता येत नाही.