नवी दिल्ली- वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नवीन स्टोअर सुरू करण्यासाठी परवान्यांची संख्या कमी करण्याची विनंती केली आहे. तसेच ई-कॉमर्स क्षेत्रातील डाटा गोपनीयता आणि नियमानातील स्थिरतेचा विषयही पत्रात त्यांनी उपस्थित केला आहे.
देशातील लघू आणि मध्यम उद्योगांचे सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी वॉलमार्ट बांधील असल्याचे मॅकमिलन यांनी पत्रात म्हटले आहे. स्थिर असे नियमन करणारे वातावरण असल्यास आम्ही त्याचे स्वागत करतो. अशा स्थितीमुळे नवीन रोजगार निर्मिती होण्यासाठी गुंतवणूक करणे शक्य होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पायाभूत सुविधांची बांधणी केल्याने भारतीय पुरवठादार आणि ग्राहकांना फायदा होईल, असेही मॅकमिलन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ई-कॉमर्स आणि किरकोळ क्षेत्रातील विक्रेत्यांचे पंतप्रधानांनी गाऱ्हाणे ऐकून घेतल्याने मॅकमिलन यांनी त्यांचे कौतुक केले. सरकारप्रमाणेच आम्हाला भारतीय नागरिकांकडील डाटाच्या गोपनीयबाबत चिंता वाटते. फोन पे आणि फ्लिपकार्टने स्थानिक डाटाच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामधून देशाच्या वाढत्या डाटा अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. मात्र, ऑनलाईन रिटेलमध्ये केलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीबाबत नियम बदलल्याने वॉलमार्ट अडचणींना सामोरे जात आहे.