सॅन फ्रान्सिस्को- अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध आणखी भडकले आहे. अशा स्थितीत आयफोनच्या किंमती ३ टक्क्याने वाढण्याची शक्यता असल्याने त्याचा ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे.
चीनमधील उत्पादित केलेल्या बॅटरी आणि इतर घटकांचा उत्पादन खर्च हा २ ते ३ टक्क्याने वाढेल, असे डॅन एल्वस या विश्लेषकाने म्हटले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आयफोनकडून किंमती वाढविल्या जाण्याची शक्यता आहे.यामुळे आयफोन एक्स एसची किंमत ही ९९९ डॉलरवरून १ हजार २९ डॉलर होईल, असे त्यांनी म्हटले आहे. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चीनच्या उत्पादित मालांवरील आयात शुल्कात वाढ केली तर आणखी आयफोनच्या किंमती वाढू शकतात. याचा परिणाम म्हणून आयफोनच्या किंमतीत १२० डॉलरने वाढ होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.