नवी दिल्ली - केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन ३ मे रोजीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत वाहनांची सोय नसल्याने अनेक नागरिकांना रुग्णालय आणि मेडिकलपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. ही अडचण लक्षात घेवून 'उबेर इसेन्शियल'सेवा बंगळुरू, नाशिक, गुरुग्राम आणि हैदराबादमध्ये सुरू करण्यात आली आहे.
उबेर ऑपरेशन प्रमुख प्रभजीत सिंग म्हणाले, रुग्णालयासारख्या आवश्यक सेवा पुरविणाऱ्या ठिकाणी नागरिकांना पोहोचण्यासाठी उबेरने सेवा सुरू केली आहे. त्यासाठी स्थानिक यंत्रणेची परवानगी घेण्यात आली आहे. तसेच विविध शहरांच्या स्थानिक यंत्रणेशी चर्चा करण्यात येत आहे. त्यांच्या परवानगीनंतर गरज लक्षात घेवून काही शहरात सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांना त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावी लागणार आहेत.