नवी दिल्ली – ऑनलाईन घरपोहोच अन्न देणाऱ्या स्विग्गीने 350 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक परिणाम झाल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.
स्विग्गीने मे महिन्यात विविध शहरातील 1 हजार 100 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले होते. टाळेबंदी खुली होताना उद्योग केवळ 50 टक्के सावरला आहे. त्यामुळे 350 कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून काढले आहे.
कर्मचाऱ्यांबद्दल पूर्ण आदर आणि सहानुभूती आहे. कर्मचाऱ्यांच्या काळजीसाठी त्यांना पॅकेज देण्यात येणार आहे. त्यामध्ये तीन महिने ते आठ महिन्यांच्या वेतनाचा समावेश आहे. तर कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना अपघात विमासह आरोग्य विमा डिसेंबर 2020 पर्यंत देण्यात येणार आहे. याचबरोबर कर्मचाऱ्यांना तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य विकास, लॅपटॉपची मालकी, नोकरीसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन सेवा देण्यात येणार आहे.
यापूर्वी कंपनीकडून 1 हजार 100 कर्मचाऱ्यांची कपात
केंद्र सरकारने टाळेबंदी ४.० घोषित केल्याच्या पहिल्याच दिवशी स्विग्गीच्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला होता. स्विग्गीने टाळेबंदी घोषित केल्यानंतर पहिल्याच दिवशी १ हजार १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. महामारीमुळे देशातील व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने कंपनीने हे पाऊल उचलले होते.