महाराष्ट्र

maharashtra

सुंदर पिचाईंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा; अल्फाबेटच्या सीईओपदी नियुक्ती

By

Published : Dec 4, 2019, 2:11 PM IST

पिचाई हे गुगलमध्ये २००४ ला रुजू झाले. त्यांनी गुगलचा टूलबार आणि गुगल क्रोम विकसित करण्याच्या कामाचे नेतृत्व केले. त्यामुळेच गुगलला जगातील सर्वात लोकप्रिय इंटरनेट ब्राऊझर होणे शक्य झाले

Sundar Pichai becomes Alphabet CEO
Sundar Pichai becomes Alphabet CEO

सॅन फ्रानिस्को -गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मूळ भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांची अल्फाबेट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. अल्फाबेट ही गुगलची पालक (पेरेंट) कंपनी आहे. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सेर्जी ब्रिन यांनी अल्फाबेटच्या सीईओ पदाचा स्वत:हून राजीनामा दिला आहे. या जागेवर पिचाई यांची वर्णी लागली आहे.

लॅरी पेज आणि ब्रिन हे यापुढेही अल्फाबेटचे शेअर भागीदार, सहसंस्थापक तसेच कंपनीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर पिचाई हे गुगलचे सीईओ आणि अल्फाबेटचे संचालक म्हणून राहणार आहेत. लॅरी पेज आणि ब्रिन यांनी गेली २१ वर्षे दिलेले योगदान अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. ते पुन्हा संचालक मंडळामध्ये सहभागी असणार आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असे अल्फाबेट संचालक मंडळाचे चेअरमन जॉन हेननेस्सी यांनी म्हटले आहे.

सुंदर पिचाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, मी अल्फाबेटबाबत खूप उत्साही आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या आव्हानांवर मात करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. नवी जबाबदारी घेताना लॅरी आणि सेर्जी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्यांचा मी आभारी आहे. मूल्य वाढविणे आणि संस्कृतीचे एकत्रीकरण तसेच विस्तारीकरण करण्यासाठी आमची कालमर्यादा नसलेली मोहिम आहे. बळकट पायावर आम्ही बांधणी करणार आहोत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा-नव्या वर्षात चारचाकी महागणार; मारुती सुझकीपाठोपाठ टाटा मोर्टसही किमती वाढविणार

सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गुगलने मिळविले अफाट यश!
पिचाई हे गुगलमध्ये २००४ ला रुजू झाले. त्यांनी गुगलचा टूलबार आणि गुगल क्रोम विकसित करण्याच्या कामाचे नेतृत्व केले. त्यामुळेच गुगलला जगातील सर्वात लोकप्रिय इंटरनेट ब्राऊझर होणे शक्य झाले.
पिचाई यांची २०१४ मध्ये उत्पादन आणि अभियांत्रिकी प्रमुख नियुक्ती करण्यात आली. यामध्ये त्यांच्यावर सर्व गुगल प्रोडक्टस आणि माध्यमांची जबाबदारी देण्यात आली. यामध्ये गुगल सर्च, मॅप्स, प्ले, अँडाईड, क्रोम अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे. सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखालील उत्पादनांचा चांगले यश मिळाले. हे पाहून त्यांची ऑगस्ट २०१५ मध्ये थेट गुगलच्या सीईओपदी निवड करण्यात आली. त्यानंतर गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या संचालक मंडळावर त्यांची जूलै २०१७ मध्ये नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा-एचडीएफसीची नेट बँकिग, मोबाईल अॅप सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद.. ग्राहकांना मनस्ताप

नव्या तंत्रज्ञानात गुगलचीच राहिली आघाडी-
पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गुगलने नवी उत्पादने आणि सेवांवर लक्ष केंद्रित केले. त्यामध्ये कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा समावेश असलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. तर गुगल क्लाउड आणि युट्यूबने गुगलची लोकप्रियता आणि व्यावसायिक यशात आणखी भर पडली. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गुगल हे मशिन लर्निंग आणि क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये सर्वात आघाडीवर राहिले आहे.

पिचाई यांनी चेन्नईत घेतले शिक्षण-
पिचाई यांनी चेन्नई येथील आयआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि व्हॉर्टॉन स्कूलमधून एमबीएची पदवी मिळविली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details