नवी दिल्ली - टाळेबंदीने विमान सेवा वाहतूक क्षेत्रावर परिणाम झाला असताना स्पाईसजेटने नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी चालू केली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) स्पाईएक्सप्रेसला ड्रोनच्या चाचण्या घेण्याची परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर स्पाईसएक्सप्रेसकडून ड्रोनद्वारे वैद्यकीय साधने, जीवनावश्यक वस्तू आणि ई-कॉमर्सची उत्पादने ग्राहकांपर्यत पोहोचविली जाणार आहेत.
स्पाईसजेटचे व्यस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, की नवसंशोधन आणि तंत्रज्ञान हे नेहमीच स्पाईसजेटच्या मिशनचे मूलभूत तत्व राहिले आहे. आम्ही नेहमीच उत्पादन आणि सेवांमधून नवसंशोधनाला प्रोत्साहन देत आहोत. देशात जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ड्रोनचे तंत्रज्ञान हे कमी खर्चात उपयोगी पडू शकते. नाशवंत उत्पादने आणि औषधांची देशातील दुर्गम भागात वाहतूक करण्यासाठी उत्साही आणि आशावादी असल्याचेही त्यांनी सांगितले.