नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या किमती जानेवारीपासून वाढणार आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने वाहनांच्या किमती वाढविण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
गतवर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मारुतीच्या वाहनांच्या उत्पादन खर्चावर परिणाम झाला. ही माहिती मारुती सुझुकीने शेअर बाजाराला दिली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने अतिरिक्त उत्पादना खर्चाचा भार काही प्रमाणात ग्राहकांवर टाकण्यात येणार आहे. मारुती सुझुकीच्या वाहनांच्या किमती विविध प्रमाणात वाढणार आहेत. मारुती अल्टो ते प्रिमिअर बहुउपयोगी एक्सएल ६ अशा विविध श्रेणींची वाहने मारुती सुझुकीकडून विकली जातात. या वाहनांची किंमत २.८९ लाख ते ११.४७ लाखापर्यंत आहे.