महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

फेसबुकला ३४ हजार ५०० कोटीचा दंड, कंपनीकडून मुख्य गोपनीय अधिकाऱ्याची नियुक्ती - Marathi Business News

दंड ठोठावल्यानंतर फेसबुकने नवी गोपनीय (प्रायव्हसी) समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती गोपनीयता राखण्यासाठी कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करणार आहे.

संग्रहित - फेसबुक

By

Published : Jul 24, 2019, 9:52 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - गोपनीयतेचा भंग केल्याने फेसबुकला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती व्यापार आयोगाने (एफटीसी) फेसबुकला ५ अब्ज डॉलर म्हणजे ३४ हजार ५०० कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर फेसबुकने त्यांच्या उत्पादनांसाठी मुख्य गोपनीय अधिकाऱ्याची नियुक्तीही केली आहे.

दंड ठोठावल्यानंतर फेसबुकने नवी गोपनीयता समिती (प्रायव्हसी कमिटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती गोपनीयता राखण्यासाठी कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करणार आहे.

फेसबुकने एफटीसीला दंड भरण्याचे मान्य केले आहे. फेसबुकच्या अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या गोपनीय माहितीवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा गमाविली होती. या प्रकरणात एफटीसीने फेसबुकला दंड ठोठावला आहे.

मार्क झुकेरबर्गने ही दिली आहे प्रतिक्रिया-
फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने फेसबुक पेजवर पोस्ट लिहिली आहे. त्याने म्हटले आहे की, आम्ही ऐतिहासिक (हिस्टॉरिकल) दंड भरण्याचे मान्य केले आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, कंपनी चालविणे आणि उत्पादने विकसित करणे यासाठी संरचनात्मक बदल करणार आहोत.

लोकांची वैयक्तिक गोपनीयता राखणे ही आमची जबाबदारी आहे. ही जबाबदारी टिकविण्यासाठी यापूर्वीच आम्ही खूप मेहनत घेतली आहे. मात्र आम्ही आता उद्योगासाठी पूर्णपणे नवे मानांकन निश्चित करणार आहोत. माझ्यासह सर्व कार्यकारी अधिकारी हे गोपनीयतेला बांधील असतील, असेही झुकेरबर्गने म्हटले आहे. नव्या गोपनीयतेच्या बांधिलकीमुळे नवी उत्पादने सेवेत आणण्यास कदाचित वेळ लागेल, अशी शक्यताही झुकेरबर्गने व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details