मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांनी मालमत्ता विकून बँकेचे पैसे फेडण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी रोल्स राईस, विमान व यांत्रिकी बोट अशी आपली मालमत्ता विकावी, असे आरोपींनी भारतीय रिझर्व्ह बँकेसह तपास संस्थांना पत्र लिहिले आहे.
एचडीआयएलचे प्रवर्तक असलेले वाधवान पिता-पुत्र हे न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपींनी ईडी, केंद्रीय वित्तीय मंत्रालय आणि आरबीआयला पत्र लिहून जप्त केलेल्या १८ मालमत्तांची विक्री करण्याची परवानगी मागितली आहे. हे पत्र वाधवानच्या प्रवक्त्याने जारी केले आहे.
मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, पीएमसीमध्ये ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून वाधवान यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने राकेश वाधवान याच्या मालकीच्या रोल्स राईस फँटम, बेंटली काँटिनेन्टल, बीएमब्ल्यू ७३० एलडी अशा आलिशान चारचाकी जप्त केल्या आहेत. तर सारंगच्या मालकीचे फाल्कन २००० विमान, ऑडी एजी, फेर्टी ८८१ ही यांत्रिकी बोट, दोन इलेक्ट्रिक कार, तीन क्वाड बाईक्स आणि ७ आसनी स्पीड बोट अशी मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.