मुंबई- आगामी सणाच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) किरकोळ कर्ज घेणाऱ्यांसाठी प्रक्रिया शुल्क १०० टक्के माफ केले आहे. यामध्ये कार, सोने आणि वैयक्तिक कर्जाचा समावेश आहे. हे किरकोळ कर्ज बँकेच्या ग्राहकांना एसबीआयच्या योनो अॅपमधून घ्यावे लागणार आहे.
एसबीआयने गृहकर्ज घेणाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गृहकर्ज घेण्याच्या प्रक्रियेवरील सर्व शुल्क रद्द करण्यात आले आहे. तर कर्जाच्या व्याजदरावर १० बेसिस पाँईटपर्यंत सवलत देण्यात येत आहे. हे कर्ज क्रेडिट स्कोअर आणि गृहकर्जाच्या रकमेवर असेल, असे एसबीआयने स्पष्ट केले आहे.
योनो अॅपमधून गृहकर्ज घेणाऱ्यांना ५ बेसिस पाँईटने सवलत मिळणार आहे. कार खरेदी करणाऱ्यांना ७.५ टक्क्यांपासून म्हणजे सर्वात कमी व्याजदर द्यावा लगाणार आहे. तर कारच्या निवडक मॉडेलवर १०० टक्के रोड फायनान्स देण्यात येणार आहे. देशातील गृहकर्जाच्या बाजारपेठेत एसबीआयचा एकूण ३४ टक्के हिस्सा आहे. तर वाहनांच्या एकूण कर्जात स्टेट बँकेचा ३३ टक्के हिस्सा आहे.
सोने खरेदी करणाऱ्यांना वार्षिक व्याजदर ७.५ टक्के मिलणार आहे. सोने खरेदीचे पैसे भरण्यासाठी ३६ महिन्यापर्यंतची मुदत आहे. ग्राहकांना वार्षिक व्याजदर ९.६ टक्क्यांनी वैयक्तिक कर्ज देण्यात येणार आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजीटल बँक) म्हणाले, की अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे. ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सणानिमित्त ऑफर देत आहोत. योनोमधून कागदविरहित वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज घेता येणार शक्य आहे.
एसबीआयचे सुमारे ७६ दशलक्ष ग्राहक इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करतात. तर १७ दशलक्ष ग्राहक मोबाईल इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करतात.