मेलबोर्न - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) मानाच्या शिरपेचात नवा तूरा खोवला गेला आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ही पहिली बँक ठरली आहे. बँकेने नुकतेच मेलबोर्नमध्ये कार्यालय सुरू केले आहे.
व्हिक्टोरिया आणि भारतामधील व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध वाढविण्यासाठी एसबीआयची मेलबोर्नमधील शाखा सहाय्य करणार आहे. व्हिक्टोरिया आणि भारताने सामाईक भविष्यासाठी दहा वर्षांची रणनीती (स्ट्रॅटजी) जाहीर केली आहे.
व्हिक्टोरियाच्या लोकप्रतिनधीगृहाचे सचिव आणि खजिनदार स्टिव्ह डिमोपोवूलोस म्हणाले, व्हिक्टोरियामध्ये एसबीआयचे स्वागत करताना आनंद होत आहे. ही या राज्यात सुरू होणारी पहिली भारतीय बँक आहे. भारतामधील सर्वात मोठ्या व्यवसायिक बँकेची येथील गुंतवणूक म्हणजे आम्ही वित्तीय सेवांच्या क्षेत्रात समृद्ध असल्याचे निर्देशक आहे. तसेच आमचे मनुष्यबळ अतिकुशल असल्याचा पुरावा आहे.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँक सलग पाचव्यांदा ४ ऑक्टोबरला रेपो दरात कपात करण्याची शक्यता
मेलबोर्न शहर हे अत्यंत व्यावसायिक आणि उद्योगस्नेही आहे. अशा शहरात बँकेचे कार्यालय असणे म्हणजे खूप चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश कुमार खेरा यांनी दिली. मेलबोर्नमधील बँकेने उठविलेला ठसा हा दोन देशामधील संबंध अधिक वृद्धिगंत करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.