मुंबई - रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक, चेअरमन आणि दानशूर नीता अंबानी यांनी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांकरिता दिलासादायक निर्णय घेतला आहे. नीता अंबानी यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून सरकारच्या कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याची विनंती केली आहे. लसीकरणात कर्मचाऱ्यांचे आई-वडील, पत्नी, मुले यांचा खर्च रिलायन्सकडून केला जाणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अकार्यकारी संचालक नीता अंबानी यांनी ई-मेलमध्ये पाठविलेल्या पत्रात म्हटले की, कुटुंबाच्या आरोग्य व आनंदाची काळजी घेणे म्हणजे रिलायन्सच्या कुटुंबाचा भाग बनणे आहे. तुमच्या सहकार्याने आपण सर्वजण महामारीला मागे टाकू. तोपर्यंत आपण तयारीत राहणे आवश्यक आहे. सर्वाधिक सुरक्षितता आणि स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणे आवश्यक आहे. आपण कोरोनाविरोधातील लढाईत शेवटच्या टप्प्यात आहोत. एकत्रिपणे आपण जिंकायलाच पाहिजे आणि आपण जिंकणार आहोत.