नवी दिल्ली– रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने ई-फार्मा कंपनी नेटमेड्समध्ये मोठा हिस्सा घेतला आहे. त्यासाठी रिलायन्सकडून नेटमेडला सुमारे 620 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
रिलायन्स नेटमेडची मालकी असलेल्या विटालिकमध्ये 60 टक्के हिस्सा घेणार आहे, तर विटालिकच्या इतर तीन कंपन्यांची पूर्ण मालकी घेणार आहे. यामध्ये ट्रेसरा हेल्थ प्रायव्हेट, नेटमेड्स मार्केट प्लेस आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्युटिशन या कंपन्यांचा समावेश आहे. विटालिक हेल्थ आणि इतर तीन कंपन्यांना मिळून नेटमेड्स म्हटले जाते.
प्रत्येकाला डिजीटल सुविधा देण्याच्या वचनबद्धतेला अनुसरूनच ही गुंतवणूक असल्याचे रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालिका इशा अंबानी यांनी सांगितले. नेटमेड्सची भर पडल्याने रिलायन्स रिटेलला चांगला दर्जा आणि अधिक परवडणाऱ्या दरात आरोग्याची उत्पादने, सेवा देणे शक्य होणार असल्याचेही अंबानी यांनी म्हटले आहे.
नेटमेड्समधून औषधी विक्रेत्यांकडील औषधे व आरोग्याची उत्पादने ग्राहकांपर्यत घरपोहोच दिली जातात. नेटमेड्स हे रिलायन्स कुटुंबाशी जोडणे हा खरोखर अभिमानास्पद क्षण आहे. प्रत्येकाला परवडणाऱ्या दरात आणि सहज चांगली आरोग्य उत्पादने देण्यासाठी एकत्रित काम करणार असल्याचे नेटमेड्सचे संस्थापक आणि सीईओ प्रदीप दाधा यांनी सांगितले.
नेटमेड्स ही दाधा फार्माची चेन्नईमधील प्रवर्तक कंपनी आहे. दाधा कुटुंब हे औषधी उद्योगात 1914 पासून कार्यरत आहेत.