मुंबई– टाळेबंदी असतानाही घौडदौड सुरू असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड गाठला आहे. कंपनीने केवळ 58 दिवसात 1 लाख 68 हजार 818 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली आहे. या गुंतवणुकीनंतर कंपनीवरील लाखो कोटी रुपयांचे कर्ज फिटले आहे.
रिलायन्सच्या गुंतवणुकीत जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांची गुंतवणूक आणि रिलायन्सच्या राईट्स इश्श्यूचा समावेश आहे. या गुंतवणुकीनंतर रिलायन्स कर्जमुक्त झाली आहे. जगभरातील कोणत्याही कंपनीला रिलायन्सएवढी कमी वेळात गुंतवणूक मिळविणे शक्य झाले नाही.
कंपनीने भारत पेट्रोलियमला हिस्सा विकल्यानंतर कंपनीने एकूण 1.75 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी मिळविला आहे. गेल्या वर्षी रिलायन्सवर 31 मार्च 2020 ला 1 लाख 61 हजार 35 कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, हे कर्ज आता पूर्णपणे फिटले आहे.
जिओने जगभरातली तंत्रज्ञान गुंतवणूक कंपन्यांकडून 1 लाख 15 हजार 693.95 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली आहे. यामध्ये फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा पार्टनर्स,पीआयएफ आदी कंपन्यांचा समावेश आहे. तर रिलायन्स राईट्स इश्श्यूचे शेअर हे 1.59 टक्के अधिक प्रमाणात विकले गेले आहेत. ही गेल्या दहा वर्षातील बिगर वित्तीय कंपनीची सर्वाधिक राईट्स इश्श्यूची विक्री ठरली आहे. राईट इश्श्यू म्हणजे समभागधारकांना केवळ अतिरिक्त समभाग खरेदी करण्याची परवानगी देण्यात येते.
मुकेश अंबानी म्हणाले, की रिलायन्स कंपनी कर्जमुक्त करण्याचे नियोजन 31 मार्च 2021 पर्यंत होते. त्यापूर्वीच कंपनी कर्जमुक्त झाल्याचे जाहीर करताना आनंद व अभिमानास्पद वाटत आहे. मी तुम्हाला खात्री देवू इच्छितो, रिलायन्स ही सुवर्णदशकात पोहोचली आहे. आणखी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासाठी प्रगती करणार आहे. ते यश मिळविणे आणि संस्थापक धीरुभाई अंबांनी यांचे व्हिजन पूर्ण करण्याचीही खात्री देत आहोत. देशाची समृद्धी वाढविण्यासाठी सतत योगदान देण्याबरोबर सर्वसमावेशक प्रयत्न करण्यात येणार आहेत.