चेन्नई - लक्ष्मी विलास बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची (पीसीए) कारवाई केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढलेल्या बुडित कर्जासह (एनपीए) इतर कारणांमुळे लक्ष्मी विलास बँकेला वित्तीय शिस्त लागण्यासाठी ही कारवाई केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाच्या कारवाईची माहिती लक्ष्मी विलास बँकेने शेअर बाजाराला दिली आहे.
बँकेवरील कारवाईची ही आहेत कारणे
- वाढलेले एनपीएचे प्रमाण
- जोखीम घेण्यासाठी कमी झालेले भांडवलचे प्रमाण (सीएआर)
- सलग दोन वर्षे मालमत्तेवर मिळणाऱ्या परताव्याचे घटलेले प्रमाण
- मालमत्तेसाठी घेण्यात आलेल्या कर्जाचे वाढलेले प्रमाण
हेही वाचा-नेतृत्वाने उत्कृष्ट होण्याकरिता प्रेरित करावे; खचवू नये - टाटाचे वरिष्ठ अधिकारी
पीसीएची कारवाई करण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमाप्रमाणे ३१ मार्चला लक्ष्मी विलास बँकेचे परीक्षण केले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर काही निर्बंध लादले आहेत. दर महिन्याला बँकेला प्रगतीचा आढावा भारतीय रिझर्व्ह बँकेला सादर करावा लागणार आहे. ही कारवाई बँकेची कामगिरी सुधारणा करण्यासाठी करण्यात आली आहे. त्याचा रोजच्या व्यवहारावर तसेच मुदत ठेवी देव-घेवीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे लक्ष्मी विलास बँकेने म्हटले आहे.