मुंबई - आरबीआयकडून पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांमधून ग्राहकांना केवळ 1 हजार रुपये काढता येणार आहेत. पैसे परत घेण्यासाठी ग्राहकांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली, डोबिंवली, मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील बँकेच्या शाखेत गर्दी केली आहे.
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात आरबीआयला अनियमितता आढळून आली आहे. आरबीआयने 35 अ नियमानुसार बँकेवर निर्बंध लादले आहेत.
हेही वाचा- भारतात आर्थिक अरिष्ट नाही, प्रकाश जावडेकर यांचा दावा
बँकेचे एमडी जॉय थॉमस यांनी स्विकारली जबाबदारी -
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. या परिस्थितीतून लवकरात लवकर बँक बाहेर येईल, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. बँकेच्या राज्यातील विविध शाखामध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. बँकेत ठेवलेल्या ठेवी व बचत रक्कमेबद्दल ग्राहकांनी बँक प्रशासनाकडे विचारणा सुरू केली आहे. यामुळे काही शाखांमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याचेही चित्र पाहायला मिळाले. बँक खात्यांमधून केवळ 1 हजार रुपयेच काढता येणार असल्याने पुढील 6 महिने बँक ग्राहक व छोटे गुंतवणूकदार यांना त्रास सहन करावा लागणार आहे. बँक ग्राहकांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालय व आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरबीआयच्या निर्बंधाने पीएमसी बँकेचे ग्राहक चिंताग्रस्त
हेही वाचा-एटीएम कार्डवरील सेवा शुल्क टाळण्यासाठी 'असा' करा स्मार्ट वापर
रायगड : पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेसमोर संतप्त ग्राहकांची गर्दी
जिल्ह्यात खोपोली येथे पीएमसी बँकेच्या शाखेबाहेर सकाळपासून ग्राहकांनी गर्दी केली. रिझर्व्ह बँकेची नोटीस बाहेर लावण्यात आली आहे. या शाखेत हजारो ग्राहकांनी ठेवी ठेवल्या आहेत. काही जणांनी आपल्या आयुष्यभराची कमाई बँकेत जमा केली आहे. बँकेत ग्राहकांनी मुदत ठेवी, बचत खाते व रिकरिंग खाते उघडली आहेत. ग्राहकांना सकाळपासूनच पीएमसी बँक बंद होणार असल्याचे फोन व मेसेज येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ग्राहकांनी बँकेत धाव घेतली.ग्राहकांनी बँकेसमोर रांगा लावलेल्या होत्या. आर्थिक संकट उभे राहिले असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा- आरबीआयकडून ४ ऑक्टोबरच्या पतधोरण निर्णयात पुन्हा व्याजदर कपात होणार : तज्ज्ञांचा अंदाज
डोंबिवलीत पीएमसी बँकेच्या शाखेसमोर हजारो ग्राहकांची धडक-
रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादल्याने पीएमसीचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद आहेत. तर, एकावेळी हजार रुपयेच मिळत असल्याने डोंबिवलीतील वैतागलेल्या ग्राहकांनी पीएमसी बँकेच्या निळजे शाखेसमोर गर्दी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बँकेत मोठ्या संख्येने ग्राहक जमल्यानंतर त्यांचे कर्मचाऱ्यांसोबत वाद झाले. डोंबिवलीतल्या लोढा हेवन परिसरात पंजाब महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. निळजे गावासह आजूबाजूची खेडी आणि लोढा हेवन, कसा रिओ, पलावा यासारख्या उचभ्रू वसाहतीमधील ग्राहक येथील शाखेशी जोडली आहेत. खेड्यातील नागरिकांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी तर पलावासारख्या वसाहतीतील नागरिकांनी मोठ्या रकमेची ठेवी गुंतवणूक म्हणून ठेवल्या आहेत.