नवी दिल्ली- देशातील मोठ्या रेल्वे स्टेशनमध्ये वाय-फायची सुविधा देण्यात येते. या सेवेतून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. कंपनीने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ११० कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ही मिनी रत्न (श्रेणी-१) दर्जाची कंपनी आहे. या कंपनीकडे देशातील सर्व मोठ्या शहरात आणि ग्रामीण भागात स्वत:च्या मालकीचे फायबर नेटवर्क आहे. या कंपनीने रेल्वे स्टेशनला डिजीटल हबमध्ये रुपांतरण करण्यासाठी मदत केली आहे. सध्या, देशात ४ हजार ९०० हून अधिक रेल्वे स्टेशनमध्ये रेलवायर या वाय-फायची सुविधा देण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये रेलटेलची १ हजार १७ कोटींची उलाढाल झाली आहे. तर निव्वळ ११० कोटींचा नफा मिळविला आहे.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँकेची लक्ष्मी विलास बँकेवर तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची कारवाई, 'ही' आहेत कारणे
काय काम करते रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ?
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित येणारी कंपनी आहे. ही कंपनी २००० साली दूरसंचार सेवा देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. रेलटेलमधून रेल्वेला अधिक कार्यक्षम व अद्ययावत बनवण्यासाठी देशभर इंटरनेट, दूरसंचार व मल्टिमीडियाच्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येते.
मिनीरत्न कंपनी म्हणजे काय आहे?
सरकारी कंपन्यांची उलाढाल, भांडवली मूल्य आणि नफा या निकषावर आधारित वर्गवारी केली जाते. देशात ८ महारत्न कंपनी, १६ नवरत्न कंपनी आणि ७४ मिनी रत्न कंपन्या आहेत. मिनी रत्न कंपन्यांमध्ये श्रेणी १ व श्रेणी २ अशी वर्गवारी आहे.