नवी दिल्ली - मंदिचे जागतिक संकट असतानाही पाया मजबूत असल्याने भारताची अर्थव्यवस्था बळकट आहे. इलेक्ट्रॉनिक्ससह मोबाईल कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केले. ते विविध मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या सीईओ आणि प्रमुखांच्या कार्यक्रमात बोलत होते.
भारतामध्ये उत्पादनाचे जागतिक हब होण्याची क्षमता असल्याची भूमिका प्रसाद यांनी मांडली. यावेळी त्यांनी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्मितीसाठी गुंतवणूक करा, असे आवाहन केले. त्याचबरोबर रणनीती, संरक्षण, वैद्यकीय उपकरणे आणि रोबोटिक्समध्ये गुंतवणूक करण्याचे त्यांनी आवाहन केले. पुढे ते म्हणाले, थेट विदेशी गुंतवणूक आणि विदेशी चलनाचा राखीव निधी हे सदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे. निर्यातक्षम इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन करणारे हब होण्याची देशाची आकांक्षा पूर्ण होण्यास फार वेळ लागणार नाही. देशाला २०२५ पर्यंत सुमारे २८.४३ लाख कोटींची इलेक्ट्रॉनिक उत्पादन व्यवस्था करायची आहे. त्यासाठी नवे धोरण तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा-'खबरदार... पाकिस्तानचा कांदा आणलात तर आम्ही मार्केट जाळू'
विकासासाठी '५ जी' ही नवी आघाडी आहे. भारताची ५ जी ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी सरकार उत्सुक आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या रणनितीमध्ये भारत हा मोठे नेतृत्व होण्याची गरज आहे. सौर, स्वयंचलित आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स यासाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. भारतामध्ये वैद्यकीय उपकरणांसाठी मोठी क्षमता आहे. उद्योगाला सरकार पूर्णपणे मदत करेल, असे त्यांनी आश्वासन दिले. उद्योगाबरोबर नियमित चर्चा होण्यासाठी संस्थात्मक यंत्रणेच्या स्वरुपात टास्कफोर्स तयार करण्यात आले आहे. त्यामधून उद्योगाच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत.