मुंबई - कॅश बॅक योजनेचा गैरवापर करून व्यापाऱ्यांनी पेटीएम कंपनीची १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याची माहिती पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी माध्यमांना दिली. याप्रकरणी कारवाई करत कंपनीने सुमारे १०० व्यापाऱ्यांची पेटीएममधील नोंदणी रद्द केली आहे. तर १० कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढले आहे.
दिवाळीनंतर काही व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कॅश बॅक योजनेतून पैसे मिळाल्याचे पेटीएम टीमला दिसून आले. त्यानंतर लेखापरीक्षकांना सखोल परीक्षण करण्याची सूचना दिली होती, असे विजय शेखर शर्मा यांनी माध्यमांना सांगितले. पेटीएम सध्या ईवाय या कन्सल्टन्सीच्या मदतीने लेखापरीक्षण करत आहे. काही विक्रेत्यांनी पेटीएमच्या कर्मचाऱ्यांची मदतीने बेकायदेशीररित्या कॅश बॅक योजनेतून पैसे मिळविले आहेत.
याप्रकरणी दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.