मुंबई - कोरोना महामारीने अनेक बदल झाले आहेत. तसेच बँक ग्राहकांच्या आर्थिक व्यवहार करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिजीटल व्यवहाराचे प्रमाण ६० टक्क्यांवरून ६७ टक्के झाले आहे. ही माहिती स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्या काळात टाळेबंदी लागू केल्याने नागरिकांना फिरण्यावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून ई-कॉमर्स वेबसाईटवरील खरेदीसाठी डिजीटल व्यवहार वाढल्याची माहिती स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा यांनी दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही सर्व प्रकारच्या ग्राहकांना सेवा देत आहोत. आरटीजीएस आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) यामुळेही डिजीटल व्यवहार वाढण्यास मदत झाली आहे.
हेही वाचा-लशीचे दुष्परिणाम झाल्यास आरोग्य विमा योजनेतून उपचार शक्य-आयआरडीएआय
स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा म्हणाले की, इकोसिस्टिममुळे सर्वाधिक डिजीटल व्यवहार वाढल्याचे मला वाटते. तर काही प्रमाणात बँकांच्या प्रयत्नामुळे डिजीटल व्यवहार वाढले आहेत. डिजीटल प्लॅटफॉर्म योनेने चालू आर्थिक वर्षात लक्षणीय यश मिळविले आहे. देशामध्ये ३.५ कोटी जणांना योनो अॅपची नोंदणी केली आहे. बँकेकडून मोबाईल अॅपच्या मदतीने रोज सरासरी ३५ हजार ते ४० हजार नवीन बचत खाती उघडली जातात. चालू आर्थिक वर्षात बँकेने १६ हजार कोटी रुपयांचे प्री अप्रूव्हड कर्ज मंजूर केले आहे. हे कर्ज योनोमधून १२.८२ ग्राहकांना वाटप केल्याचे खारा यांनी सांगितले.
हेही वाचा-सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण; गुंतवणुकदारांना ८ लाख कोटींचा फटका