नवी दिल्ली- दोन वर्षात १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्यात येणार असल्याची नोकियाने घोषणा केली आहे. कंपनीकडून नियोजनाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. या नियोजनात नोकियाकडून ५ जी, क्लाउट आणि डिजीटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे.
कंपनीमधील १० हजार कर्मचारी नोकरीतून कमी केल्याने २०२३ पर्यंत ६०० दशलक्ष युरोची बचत होणार असल्याचे नोकियाने म्हटले आहे. या बचतीमधील पैसे कंपनी ५ जी तंत्रज्ञानासाठी वापरणार आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये बदलती बाजारपेठ आणि ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन बिझनेस मॉडेल करणार असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा-गुगल अखेर नमले! अॅप डेव्हलपरच्या शुल्कात कपात
कंपनीचे सीईओ पेक्का लुंडमार्क म्हणाले की, प्रत्येक बिझनेस ग्रुप हा तंत्रज्ञानामध्ये नेतृत्व करण्याचे ध्येय ठेवणार आहे. यामध्ये आम्ही स्पर्धा करून जिंकणार आहोत. त्यासाठी उत्पादक गुणवत्ता आणि खर्चामध्ये स्पर्धात्मकता वाढविणार आहोत. तसेच योग्य कौशल्य आणि क्षमतामध्ये गुंतवणूक वाढविणार आहोत. नोकियाकडून ५ जी तंत्रज्ञानाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी संशोधन आणि विकासासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच डिजीटायलेझशनच्या प्रक्रियेसाठी मूल्यवर्धित साखळीमध्ये चालना देण्यात येणार आहे.
हेही वाचा-आरबीआयने स्टेट बँकेला ठोठावला २ कोटींचा दंड
नोकियाची एअरटेलबरोबर भागीदारी-
एकेकाळी मोबाईलमध्ये आघाडीवर असलेल्या नोकियाने कोरोनाच्या संकटातही मोठी व्यावसायिक मजल मारली आहे. येत्या काळात ५ जीचे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी एअरटेलने नोकियाला साडेसात हजार कोटींचे कंत्राट दिले आहे. नोकियाच्या '५ जी' तंत्रज्ञानाने भारती एअरटेलची नेटवर्क क्षमता वाढणार आहे. तसेच ग्राहकांना आणखी चांगल्या सेवेचा अनुभव घेणे शक्य होणार असल्याचे भारती एअरटेलने यापूर्वी म्हटले होते.