नवी दिल्ली - नादारी प्रक्रियेमधील जप्त केलेल्या मालमत्तेबाबत ईडी आणि कंपनी व्यवहार मंत्रालयात मतभेद आहेत. हे मतभेद दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
सक्त अंमलबजावणी संचालनालयाने भूषण पॉवर अँड स्टील लि. (बीपीएसएल) या कंपनीची मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता मनी लाँड्रिगच्या प्रकरणात जप्त केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. बीपीएसएल ही नादारी प्रक्रियेतून जात असल्याने मालमत्ता जप्त करता येत नाही, असा कंपनी व्यवहार मंत्रालयाने दावा केला आहे.
हेही वाचा-वाहन उद्योगातील मंदीने भाजपच्या बहुमताला लावला 'ब्रेक'; 'ऑटो हब' म्हणून आहे महाराष्ट्रासह हरियाणाची ओळख
सध्या, हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदे अपिलीय प्राधिकरणाकडे (एनसीएलएटी) सुनावणीसाठी आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या, ईडी कंपनीच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करू शकते. त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी महसूल सचिव आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांची बैठक घेतली आहे. एनसीएलएटीमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणाबद्दल विचारले असता त्यांनी मंत्रालयाकडून अधिक जागा आणि मनुष्यबळ देण्यात येत असल्याचे सांगितले.