मुंबई - सांगली आणि कोल्हापूरसह देशातील इतर पूरग्रस्त भागामधील विमा ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय आयआरडीएआयने घेतला आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी केलेल्या विम्याच्या दाव्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश आयआरडीएआयने विमा कंपन्यांना दिले आहेत.
भारतीय विमा नियामक आयोगाने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे विम्यांचे दावे लवकर निकालात काढणारे परिपत्रक काढले आहे. याची सर्व विमा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अंमलबजावणी करावी लागणार आहे.
सर्व विम्यांची अर्जांची नोंद करण्यात यावे, असे परिपत्रकातून निर्देश देण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागात मृतदेह न सापडल्याने मृत्यू प्रमाणपत्र मिळणे कठीण जाते. अशा वेळी मृत्यू झाल्याबाबतचा विमा दावा करताना नातेवाईकांना अडचणी येतात. अशावेळी चेन्नईला २०१५ मध्ये पूर आल्यानंतर राबविलेली प्रक्रिया राबवावी, असे आयआरडीएआयने परिपत्रकात म्हटले आहे.