नवी दिल्ली– केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या डिजीटल इंडियाला गुगलकडून मोठा आधार मिळाला आहे. भारतात डिजीटालयझेशन करण्याकरता गुगल भारतात सुमारे 75 हजार कोटींची (10 अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुढील पाच वर्षांत विविध प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गुगल इंडियाची सहावी वार्षिक परिषद ही आज ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले, भारताच्या डिजीटायलेझेशन करण्याकरता घोषणा करताना मला अत्यंत उत्साह वाटत आहे. या प्रयत्नांमधून आम्ही 75 हजार कोटींची अथवा 10 अब्ज डॉलरची येत्या 5 ते 7 वर्षात गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक संमिश्र स्वरुपाची असणार आहे. त्यामध्ये भागीदारी, शेअर, देशात पायाभूत व्यवस्था चालविणे यांचा समावेश आहे. ही गुंतवणूक म्हणजे आम्हाला भारताच्या भविष्याबाबत आणि डिजीटल अर्थव्यवस्थेबाबत असलेला विश्वास यांचे प्रतिबिंब आहे.