मुंबई – गो एअर इंडियाने ग्राहकांना विमान प्रवासाकरता ‘गोफ्लायप्रायव्हेट’ ही सवलत जाहीर केली आहे. या सवलतीच्या तिकीट योजनेत ग्राहकांना विमानात विविध रांगा एकाच नावाने आरक्षित करता येत आहेत. या आरक्षित रांगांनी प्रवाशांसाठी ‘खासगी क्षेत्र’ असणार आहेत.
एखादे खासगी चार्टर भाड्याने घेवून ज्या सुविधा मिळतात, त्या सुविधा ‘गोफ्लायप्रायव्हेट’मधून मिळणार असल्याचे गोएअरने म्हटले आहे. या योजनेतून ग्राहकांना किती रांगा आरक्षित ठेवायच्या आहेत, हे ठरविता येणार आहे.
कोरोना महामारीत विमान कंपन्यांना उत्पन्न मिळविण्यात अडचणी येत आहेत. कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीने प्रवाशांची संख्या घटली आहे. अशा परिस्थितीत विमान कंपन्यांनी प्रवाशांना हॉटेलात विलगीकरणात राहण्यासाठी पॅकेज, दोन आसनांवरील तिकीटात सवलत आदी योजना जाहीर केल्या आहेत.
गोएअरचे व्यवस्थापकीय संचालक जेह वाडिया म्हणाले, की ज्या ग्राहकांना खासगी चार्टर भाड्याने घेणे शक्य होत नाही, त्यासाठी सेवा सुरू देणारी गोएअर ही पहिली कंपनी आहे. ग्राहकांकडून अशा सेवेची मागणी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.