मुंबई - कॉफी डे एन्टरप्रायजेसने गुरुवारी अर्नस्ट आणि यंग एलएलपी कंपनीची तपास करण्यासाठी नियुक्ती केली आहे. ही वित्तीय सेवा देणारी कंपनी चेअरमन व्ही.जी. सिद्धार्थ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील दाव्यांचा तपास करणार आहे.
ईवाय (अर्न्स्ट अँड यंग एलएलपी) ही कॅफे डे एन्टरप्रायजेसच्या आर्थिक ताळेबंदाचे परीक्षणही करणार आहे. कॉफी डे एन्टरप्रायजेसच्या संचालक मंडळांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत अर्न्स्ट अँड यंग एलएलपीची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मालविका हेगडे यांची कार्यकारी संचालक समितीवर अतिरिक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
व्ही.जी.सिद्धार्थ यांनी काय म्हटले होते पत्रात ?
व्ही.जी.सिद्धार्थ हे मृत्यूपूर्वी पत्र लिहून गायब झाले होते. खासगी शेअर भागीदाराकडून शेअर बायबॅक घेण्यासाठी दबाव असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. काही महिन्यापूर्वी एका मित्राकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते.
ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्या दबावामुळे मला भाग पडत आहे. यापूर्वी प्राप्तिकर महासंचालकांकडून त्रास देण्यात आला होता. त्यामध्ये माईंड ट्री कंपनीबरोबरील सौद्यात अडथळा आणणे आणि कॉफी डे शेअरचा ताबा घेणे आदींचा समावेश आहे. प्राप्तिक परताव्यासाठी सुधारीत अर्ज करूनही त्रास देण्यात आला. हे खूप चुकीचे आहे. त्यामुळे खूप आर्थिक अडचणी येत आहेत.
कॅफे कॉफी डेचे मालक २६ जुलैनंतर ३६ तास गायब होते. शोधमोहिमेनंतर त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीतून ३१ जुलैला शोधून काढण्यात आला होता.