नवी दिल्ली -अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयसीआयसीआय बँकेच्या माजी चेअरमन चंदा कोचर व त्यांचे पती दीपक यांची आज चौकशी केली. आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉनला १ हजार ८७५ कोटींचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये अनुचित प्रकार आणि अनियमितता असल्याचा चंदा कोचर यांच्यावर आरोप आहे.
ईडीने समन्स पाठविल्यामुळे चंदा कोचर या ईडीच्या मुख्यालयात आज सकाळी सुमारे साडेदहा वाजता पोहोचल्या होत्या. त्यानंतर ईडीच्या तपास अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली.
काय आहे व्हिडिओकॉनच्या कर्ज वाटपाचे प्रकरण-
व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकेडून २००९ ते २०११ दरम्यान १ हजार ८७५ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. यामध्ये अनियमितता झाल्याचा चंदा कोचर यांच्यावर आरोप आहे.
दीपक कोचर यांची मालकीची कंपनी न्यूपॉवरच्या खात्यावर बेकायदेशीर पैशाचे हस्तांतरण झाल्याची माहिती ई़डीला मिळाली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात कोचर पती-पत्नींची मुंबईत ईडीने चौकशी केली. ईडीने मार्चमध्ये कोचर यांचे घर आणि कार्यालयाची झडतीही घेतली होती. तसेच कोचर यांच्याबरोबर व्हिडिकॉन ग्रुपचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांचीही ईडीच्या तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती.
काय आहे ईडीचा दावा-
वेणूगोपाल धूत यांनी त्यांच्या सुप्रिम इनर्जी कंपनीतून कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्यूबेल्समध्ये गुंतवणूक केली. या फायद्याची परतफेड म्हणून चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज मंजूर केले. असा आरोप ईडीने कोचर यांच्यावर केला आहे. आयसीआयसी बँकेने व्हिडिओकॉनला दिलेले २ हजार ८१० कोटी रुपयांचे कर्ज एनपीए म्हणून घोषित केले आहे.