नवी दिल्ली - दूरसंचार कंपन्यांकडून थकित शुल्काची मागणी करणाऱ्या दूरसंचार विभागाने ऑईल इंडियाकडूनही शुल्काची मागणी केली आहे. ऑईल इंडिया कंपनीने दूरसंचार वाद निवारण आणि अपिलीय प्राधिकरणात (टीडीएसएटी) दाद मागितली आहे. ऑईल इंडियाकडे दूरसंचार विभागाचे ४८,००० कोटी रुपये थकित आहेत.
बिगर दूरसंचार व्यवसायामधून मिळालेल्या महसुलाचाही शुल्क लागू करताना विचार करावा, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. या निकालाप्रमाणे केंद्रीय दूरसंचार विभागाने ऑईल इंडियाला ४८,००० हजार कोटी रुपये, दंड आणि व्याजासह भरण्याची नोटीस बजावली आहे. ऑईल इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील चंद्रा मिश्रा म्हणाले, आम्हाला शुल्क भरण्याची २३ जानेवारीला नोटीस मिळाली. या नोटीसला आम्ही टीडीएसएटीमध्ये आव्हान देणार आहोत.