न्यूयॉर्क - लिब्रा हे नवे डिजीटल चलन अस्तित्वात आणण्यासाठी फेसबुकने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. द लिब्रा असोसिएशन ही स्वयंसेवी संस्था लिब्राच्या चलनाचे नियमन करणार आहे. या संस्थेने २१ सदस्यांबरोबर लिब्रा चलनासाठी जिनिव्हामध्ये सोमवारी करार केला आहे.
फेसबुककडून लिब्राचे काम सुरू असताना आजवर अमेरिकेच्या विविध लोकप्रतिनिधी आणि नियामक संस्थांनी विरोध केला आहे. तरीही फेसबुककडून लिब्राच्या लाँचिगची तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी व्हिसा, मास्टरकार्ड आणि पेपल अशा कंपन्यांनी लिब्रा संघटनेमधून काढता पाय घेतला आहे.
संघटनेमधील उर्वरित बहुतेक सदस्य हे व्हेंचर कॅपिटल कंपन्या आहेत. त्यांनी फेसबुककडून विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे. या व्यतिरिक्त उबेर, लिफ्ट, स्पॉटिफाय आणि युरोपियन टेलिक्युनिकेशन्स कंपनी व्होडाफोनही लिब्रामध्ये सहभागी झाली आहे. सुमारे १८० संस्था अथवा कंपन्यांनी लिब्रा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
स्वतंत्र डिजीटल चलन सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून फेसबुक कंपनीवर टीका होत आहे. लिब्रा चलनाचा वापर करताना फेसबुककडून वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग होईल, अशी अमेरिकेतील लोकप्रतिनिधींनी टीका केली.