नवी दिल्ली-ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या अॅस्ट्राझेनेका लसीच्या तीन ते चार डोसची किंमत सरकारसाठी २१९ ते २९२ रुपये असणार आहे. तर लसीचे उत्पादन वाढल्यानंतर खासगी बाजारपेठेत लसीची किंमत दुप्पट असेल, अशी माहिती सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी दिली.
केंद्र सरकारने सीरम कंपनीला लसीचे उत्पादन आणि वापर करण्यासाठी परवानगी दिली आहे. सीरमने यापूर्वी लसीच्या ५ कोटी डोसचे उत्पादन घेतले आहे. सीरमचे सीईओ आदार पुनावाला म्हणाले की, आम्ही कोव्हिशिल्ड ही लस सरकारला विकण्यास सुरुवात करणार आहोत. पहिल्या टप्प्यात गॅवी देशांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यानंतर खासगी बाजारपेठेत कोरोनाच्या लसीची विक्री केली जाणार आहे.
हेही वाचा-लसीला परवानगी मिळाल्यानंतर अदर पुनावालांनी व्यक्त केला आनंद
सीरमकडून दर महिन्यात १० कोटी डोसचे उत्पादन-
पुनावाला म्हणाले की, प्रत्येकाला ही लस परवडणाऱ्या दरात मिळावे, अशी आमची इच्छा आहे. केंद्र सरकारला लस ही ३ ते ४ डॉलरमध्ये मिळणार आहे. ते मोठ्या प्रमाणात लसीची खरेदी करणार आहेत. जेव्हा खुल्या बाजारात लस उपलब्ध होईल, तेव्हा लसीची किंमत ६ ते ८ डॉलर असणार आहे. सीरमकडून दर महिन्यात १० कोटी डोसचे उत्पादन घेण्यात येणार आहे. शक्य झाल्यास एप्रिलपासून हे उत्पादन दुप्पट घेण्यात येणार आहे. कोरोना लसीची खरेदीबाबत सीरम सरकारशी संपर्कात असल्याचेही पुनावाला यांनी सांगितले. सुरुवातीच्या टप्प्यात ५ कोटी डोस दिले जाणार आहेत. येत्या काही दिवसात त्याबाबत अधिक पुष्टी मिळेल, असेही पुनावाला यांनी सांगितले.
हेही वाचा-DCGI कडून कोविशिल्ड आणि कॉव्हॅक्सिन लसींना मंजुरी
जुलै २०२१ पर्यंत ३० कोटी डोस लागणार -
दरम्यान, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया ही लस उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. केंद्र सरकारने जुलै २०२१ पर्यंत ३० कोटी डोस लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. हे लसीचे डोस कोरोनाच्या लढ्यातील आरोग्य कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने दिले जाणार आहे. भारतीय औषधी महानियंत्रक यांनी कोव्हिशिल्ड आणि बायोटेकच्या कोविक्सिनला आपत्कालीन स्थितीत वापरासाठी मंजुरी दिली आहे.