नवी दिल्ली - चीनमध्ये ४०० हून अधिक जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना रोगाचा भारतीय उद्योगांवरही परिणाम होत आहे. यामध्ये वाहन प्रदर्शनासह पर्यटन आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा उत्पादन क्षेत्राचा परिणाम आहे.
देशात वाहन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी असलेल्या चिनी कंपन्यांनी केवळ भारतीय कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सला दिली आहे. तर वाहनांचे सुट्टे भाग तयार करणारी उद्योगांची संघटना एसीएमएने सुट्टे भाग तयार करणाऱ्या चिनी कंपन्यांचे प्रतिनिधी वाहन प्रदर्शनासाठी येणार नसल्याचे सांगितले. चीनमध्ये कोरोना विषाणुचे थैमान असल्याने चिनी कंपनीच्या प्रतिनिधींना प्रवास करणे शक्य होत नसल्याचेही एसीएमएने म्हटले आहे.
हेही वाचा-म्युच्युअल फंडातील लाभांशावर टीडीएस; अर्थसंकल्पात 'ही' आहे तरतूद
प्रवास क्षेत्रावर परिणाम-
कोरोना विषाणुमुळे चीनमधून भारतात येणारे आणि भारतामधून चीन जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. विमान बुकिंगचे प्रमाण कमी झाले आहे. चिनी प्रवाशांना देण्यात येणारा ई-व्हिसा भारताने तात्पुरत्या काळासाठी रद्द केला आहे. तर चीनमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना भारताने जाहीर केल्या आहेत.
मेक माय ट्रिपचे सहसंस्थापक आणि सीईओ राजेश मॅगोव म्हणाले, मेनलँड चायनासह हाँगकाँगमध्ये प्रवास करण्यावर काही दिवस निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रवाशांकडून करण्यात येणाऱ्या बुकिंगवर मोठा परिणाम झाला आहे.
हेही वाचा-सेवा क्षेत्राचा जानेवारीत 55.5 टक्के वृद्धीदर; सात वर्षातील उच्चांक
मोबाईल निर्मिती क्षेत्रावर परिणाम-
मोबाईल उद्योगाकडून दरवर्षी ९५ हजार कोटी रुपयांच्या सुट्ट्या भागांची आयात करण्यात येते. यामधील बहुतांश आयात चीनमधून करण्यात येते. चीनमधील बंद ठेवण्यात आलेले कारखाने पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची हँडसेट उत्पादक कंपन्या वाट पाहत आहेत.
हेही वाचा-जाणून घ्या, बँकेतील रकमेवर विमा संरक्षणाचा असा मिळणार फायदा
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रावर परिणाम-
जर अशीच परिस्थिती सुरू राहिली तर १० फेब्रुवारीनंतर खरे संकट येईल, अशी भीती इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे चेअरमन पंकज मोहिंद्रु यांनी सांगितले. ग्राहकोपयोगी उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपन्यांना चीनमधून सुट्ट्या भागांचा पुरवठा होतो. चीनमध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चीनमधील कारखाने उघडतील यासाठी उद्योग १० फेब्रुवारीपर्यंत वाट पाहणार आहेत. सीईएएमएचे अध्यक्ष कमल नंदी म्हणाले, आमच्या उद्योगाची ६ फेब्रुवारीला बैठक आहे. त्यावेळी चर्चा करून आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत.