नवी दिल्ली - महानगरांमध्ये गगनचुंबी इमारतीमधील कार्यालयांचे महागडे दर ही नवी गोष्ट नाही. मात्र राजधानीतील कॅनॉट प्लेस हे ठिकाण जगातील महागड्या कार्यालयांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आले आहे. येथील कार्यालयांचा भाड्यांचा दर प्रति स्क्वेअर फूट हा १४४ डॉलर म्हणजे सुमारे १० हजार ८० रुपये एवढा आहे. ग्लोबल प्राईम ऑफिस ऑक्युपटन्सी कॉस्ट सर्वेच्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.
सीबीआरईकडून जगभरातील महत्त्वाच्या ठिकाणावरील कार्यालयांच्या भाड्यांची माहिती अद्ययावत ठेवली जाते. या यादीत सलग दुसऱ्यांदा हाँगकाँगचा मध्यवर्ती जिल्हा हा जगातील सर्वात महागडे कार्यालय दर असलेले ठिकाण ठरले आहे. त्या ठिकाणी कार्यालय भाड्याने घेण्यासाठी प्रति स्क्वेअर फूट ३२२ डॉलर मोजावे लागतात.
मुंबईतील कार्यालयांचे भाड्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. मुंबई वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचे यादीमधील स्थान २६ वरून २७ व्या तर नरिमन पाँईटचे यादीमधील स्थान ३७ वरून ४० व्या स्थानावर घसरले आहे. वांद्रा कॉम्प्लेक्समध्ये भाड्यापोटी प्रति स्क्वेअर फूट ९०.६७ रुपये मोजावे लागतात. तर नरिमन पाँईटमधील कार्यालयाच्या भाड्यासाठी ६८.३८ डॉलर स्क्वेअर फूट खर्च येतो.