मुंबई- 'हमारा बजाज' या जाहिरातीमधून मध्यमवर्गीयांना भुरळ घालणारी बजाज स्कूटर आता इलेक्ट्रिक प्रकारात उपलब्ध झाली आहेत. बजाज ऑटोने चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे आज लाँचिग केले आहे. या चेतकच्या खरेदीसाठी १५ जानेवारीपासून बुकिंग करता येणार आहे.
चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख रुपये आहे. फेब्रुवारीपासून स्कूटरचे वितरण करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात फक्त पुणे व बंगळुरूमध्ये स्कूटर उपलब्ध होणार आहे. हे नव्या युगातील मोबिलीटीची सुरुवात असल्याचे बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी सांगितले.
हेही वाचा- निफ्टीने 'हा' गाठला निर्देशांक; जाणून तुम्ही होताल आश्चर्यचकीत
अशी आहे चेतक स्कूटर-
स्कूटर ही अर्बन आणि प्रिमियम अशी दोन श्रेणीत उपलब्ध असणार आहे. स्कूटरची बॅटरी घरी चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशन पॅकेज देण्यात येणार आहे. चेतक वेबसाईटवरून केवळ २ हजार रुपयात स्कूटर बुक करता येणार आहे. बजाज ऑटोच्या माहितीनुसार, १२ हजार किलोमीटर अथवा एक वर्षापर्यंत कमीत कमी देखभालीची गरज लागते. तर तीन वर्ष अथवा ५० हजार किलोमीटरपर्यंत कंपनीने लिथियम बॅटरीसहित स्कूटरला हमी (गॅरंटी) दिलेली आहे.
हेही वाचा-घाऊक बाजारपेठेतही महागाईचा भडका; डिसेंबरमध्ये २.५९ टक्क्यांची नोंद
ड्रम ब्रेक्स असलेली चेतक अर्बन ही १ लाख रुपयात खरेदी करता येणार आहे. तर डिस्क ब्रेक आणि लक्झरी दिसणारी चेतक प्रिमिअम ही १.१५ लाख रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
दोन्ही श्रेणीतील स्कूटरच्या किंमती या एक्स-शोरुमसाठी आहेत. त्यावर सर्वप्रकारचे अनुदान लागू होते. मात्र, विमा आणि रस्ते कर किमतीमधून वगळल्याचे कंपनीने म्हटले आहे.